निधी कंपनी ही एक वित्तीय संस्था म्हणून रजिस्टर असते. जशी बँकिंग संस्था असते त्याप्रमाणे निधी कंपनी ला देखील वित्तीय नियोजना संदर्भात काही निकष (Norms) पाळावे लागतात. निधी नियम २०१९ प्रमाणे निधी कंपन्यांना विवेकी निकष (Prudential Norms) लागू आहेत. विवेकी निकष हे दर वर्षी आपल्या ऑडिट रिपोर्ट मध्ये समाविष्ट असावे. मी बऱ्याच निधी कंपन्यांच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये वरील तरतूद पहिली नाहीये. आजचा विषय जरा जड आहे. ह्या विषयी ग्रुप वर अथवा वयक्तिक तपशीलवार चर्चा झाली पाहिजे.
विवेकी निकष म्हणजे काय?
गहाणखत कर्ज (Mortgage Loan) किंवा दागिन्यांच्या कर्जाच्या (Gold Loan) संदर्भात मालमत्ता ओळखणे (Revenue Recognition) आणि मालमत्तेचे वर्गीकरण (Asset Classification) करणे यासाठी प्रत्येक निधी ला ज्या नियमाचे पालन करायचे आहे त्याला विवेकी निकष म्हणतात.
मालमत्तेची ओळख आणि वर्गीकरण म्हणजे काय?
जेव्हा निधी कंपनी गहाणखत कर्ज (Mortgage Loan) किंवा दागिन्यांवर कर्ज (Gold Loan) देते तेव्हा निधीला हे कायम पडताळून पाहायचे आहे की कर्जासाठी जे तारण दिलेले आहे ते कर्जाच्या परतफेडीसाठी उपयुक्त आणि माफक आहे की नाही. त्यासाठी प्रत्येक निधीला तारण दिलेल्या मालमत्तेची ओळख आणि वर्गीकरण करणे गरजेचे आहे.
विवेकी निकष हे निधी नियम २०१९ मधील नियम २० मध्ये दिलेले आहेत. हे नियम गहाणखत कर्ज (Mortgage Loan) किंवा दागिन्यांवर कर्ज (Gold Loan) साठीच लागू आहेत. आता नियम काय आहेत ते समजावून घेऊ -
गहाणखत कर्ज (Mortgage Loan)
१. गहाणखत कर्जाच्या संदर्भात निधी कंपनीला तारणाच्या मालमत्तेचे खालील तरतूद करणे गरजेचे आहे--
Standard Asset - तरतुदीची गरज नाही
Sub-Standard Asset - शिल्लक कर्जाच्या १०%
Doubtful Asset - शिल्लक कर्जाच्या २५%
Loss Assets - शिल्लक कर्जाच्या १००%
२. नॉन-परफॉरमिंग मालमत्तेवरील व्याज किंवा इतर शुल्कासह उत्पन्न जेव्हा प्रत्यक्षात प्राप्त होईल तेव्हाच P&L A/c ला घ्या. म्हणजे नॉन-परफॉरमिंग मालमत्तेवरील व्याज हे निधीचे उत्पन्न नाही.
३. गहाणखत मालमत्तेच्या विक्रीची कार्यवाही, व्याज सुरू झाल्यापासून मागील दोन वर्षात एखाद्या न्यायालयात सुरु केली गेली असेल तर, एकूण थकबाकीतून निधी ला मान्य असलेली मालमत्तेची अंदाजित वास्तविक मूल्य कमी करा. ह्या तरतुदीमुळे प्रत्येक लोन ची अचूक थकबाकी आणि तारणाचे संरक्षण याचा अंदाज येतो.
४. त्या वर्षीच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये वरील चर्चा केल्याप्रमाणे नॉन-परफॉरमिंग मालमत्तेवरील केलेल्या तरतुदीचा उल्लेख करणे बंधनकारक आहे.
दागिन्यांवरील कर्ज (Gold Loan)
१. गोल्ड लोन ची मुदत संपल्यापासून ३ महिन्याच्या आत ते गोल्ड लोण एक तर पूर्ण पैसे भरून बंद करायला पाहिजे अथवा नुतनीकरण केलं पाहिजे. म्हणजे गोल्ड लोण जर १ वर्षासाठी दिले तर १५ महिन्याच्या आत एक तर पूर्ण लोण recover करा अथवा renewal करा. ही खूप महत्त्वाची तरतूद आहे. ज्या निधी कंपन्या सोने तारण कर्ज देतात त्यांनी ह्या नियमाचे पालन केले पाहिजे.
२. वरील नियमाचे पालन होत नसल्यास अश्या निधी कंपन्यांनी आपल्या ऑडिट रिपोर्ट मध्ये त्या संदर्भात तरतूद केली पाहिजे.
३. सोने तारण कर्ज दागिन्यांच्या किमतीच्या ८० टक्क्यांपर्यंत देता येते.
अजून काही निकष आहेत पण ते निधी संचालकापेक्षा CA ला ऑडिट करताना उपयोगाचे आहेत. म्हणून त्याबद्दल इथे माहिती देत नाहीये. मला माहित आहे की खूप क्लिष्ट विषयाला मी हात घातला आहे. पण मित्रहो, निधी चालवताना वरील गोष्टींचा विचार आणि नियोजन केल्यास आपल्या नफ्यात निश्चित वृद्धी होईल ह्यात शंका नाही.
आपण वरील विषय आपल्या CS/CA सोबत सविस्तर चर्चा केला पाहिजे.
धन्यवाद
Raghvendra Kulkarni | RBKRS | 9850432434
विवेकी निकष (Prudential Norms) ठरवताना
13.02.23 12:26 PM