निधी कंपनी बंद करणे (शक्यता आणि कायदेशीर प्रोसेस)

05.07.25 06:41 AM - By Raghav Kulkarni

निधी कंपनी बंद करणे (शक्यता आणि कायदेशीर प्रोसेस)

नमस्कार, 

सद्य परिस्थितीत निधी कंपनी सुरू करणे अथवा चालू असलेली निधी कंपनी बंद करणे हा महत्वाचा विषय होऊन बसला आहे. आपल्याला स्थानिक पातळीवर आर्थिक क्षेत्रात काम करायचे असल्यास निधी कंपनी सारखा पर्याय दुसरा नाही, असे आजही माझे वयक्तिक मत आहे. पण मागील काही वर्षात निधी संस्था या केंद्र शासनाच्या विविध नियमांमुळे कायद्याच्या चौकटीत सापडल्या आहेत. NDH-४ फॉर्म ची नवीन प्रणाली, पोलिस तक्रारी तसेच कंपनी कायद्याचे इन्स्पेक्शन आणि investigation यामुळे निधी संस्थांना खूप अडचण होऊन बसली आहे. 

निधी कंपन्यांना कायदेशीर अडचण काय आहे ? 

कंपनी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे निधी कंपन्यांना चालणे अपेक्षित आहे. शासनाने दिनांक १५ ऑगस्ट २०१९ सोबत आत्तापर्यंत विविध परिपत्रक द्वारे निधी नियमात बदल केले आहेत. त्या बदलाप्रमाने काम करणे निधी कंपन्यांना अवघड होऊन बसले आहे. कायदेशीर अडचणी खालील नोंदी मधून स्पष्ट होते - 

१. दिनांक १५ ऑगस्ट २०१९ पासून केंद्र शासनाने निधी नियमात ३-४ वेळा बदल केले. सर्वात महत्वाचा म्हणजे NDH-४ फॉर्म भरण्याची तरतूद आणली. जुन्या सर्व निधी कंपन्यांना हा फॉर्म दिलेल्या वेळेत भरणे अपेक्षित होते. 

२. ज्या निधी कंपन्यांनी NDH-४ भरला नाही अथवा ज्यांचा फॉर्म अमान्य झाला त्यांना शासनाने पुढील शेअर्स वाटप बंद करून टाकले. त्यामुळे नवीन सभासद नोंदणी आणि शेअर्स वाटप वर अंकुश लागला. तसेच त्यांना ठेवी घेणे आणि कर्ज वाटप याचे व्यवहार बंद करावे लागले. 

३. ज्या निधी कंपन्यांनी तरीही फॉर्म भरला नाही त्यांना शासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच अश्या निधी कंपन्या विरुद्ध इन्स्पेक्शन आणि investigation ची कार्यवाही चालू केली. 

४. बऱ्याच निधी कंपन्यांना NDH-४ फॉर्म भरता तरी आला नाही अथवा शासनाने त्यावर त्रुटी काढलेला ईमेल तरी नाही मिळाला. 

५. ज्यांचा NDH-४ अमान्य झाला त्यांची यादी राज्य शासनाला देऊन पोलिस मार्फत त्यांच्यावर कार्यवाही सुरू केली. 

या सर्व कायदेशीर अपेक्षेमुळे निधी कंपन्यांना काम करणे कठीण झालेले आहे. बऱ्याच निधी कंपन्यांनी ही परिस्थिती लक्षात घेऊन आपले व्यवहार बंद केले आहेत. 

निधी कंपनी बंद करण्यासंदर्भात गैरसमज काय आहेत ? 

आता महाराष्ट्रातल्या बऱ्याच निधी कंपन्यांनी व्यवहार बंद केले आहेत. पण अतिशय मोठ्या गैरसमज मध्ये ते वावरत आहेत - 

१. निधी कंपनी ने ठेवी घेणे बंद केले अथवा कर्ज देणे बंद केले त्याचा अर्थ निधी बंद झाली असा नाही. कायद्याच्या दृष्टीने निधी कंपनी ही भारताचा स्वतंत्र नागरिक आहे. म्हणजे निधी कंपनीला वेगळे अस्तित्व आहे. जोपर्यंत निधी बंद होत नाही तोपर्यंत ती चालूच असते. 

२. निधी कंपनीने आपले ऑफिस बंद केले आणि नावाचा फलक काढला की संस्था बंद होत नाही. यामुळेच बऱ्याच निधी कंपन्यांना अडचण निर्माण झाली आहे. 

३. निधी कंपनीने आपले MCA आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंद केले तर कंपनी बंद होत नाही. आपले PAN कार्ड आपोआप बंद होत नाही. 

४. निधी कंपनीच्या संचालकांनी आपला राजीनामा ROC कडे नोंद केला हे पुरेसे नाही. निधी कंपनी मध्ये ज्या काळात डिफॉल्ट अथवा गुन्हा झाला त्यावेळी जे संचालक होते ते सर्व यासाठी जबाबदार असतात. त्यानंतर संचालकांनी राजीनामा देऊन काही उपयोग नाही. 

निधी कंपनी बंद करता येते का ? 

हो ! निधी कंपनी ROC ऑफिस मधून संपूर्ण कायदेशीर रित्या बंद करता येते. कंपनी कायद्याच्या कलम २४८ अंतर्गत निधी कंपनी बंद करण्यासंदर्भात नियम दिलेले आहेत.

निधी कंपनी बंद करण्याआधी ची तयारी 

निधी कंपनी बंद करण्याचा अर्ज भरण्यापूर्वी आपली निधी कंपनी ची तयारी आहे का हे तपासणे आवश्यक आहे. एखाद्या विशिष्ट तारखेला (cut-off date) आपण त्खालील निकष आपल्या निधी मध्ये तपासून पाहा - 

१. आपण आपल्या सर्व ठेवीदारांचे सर्व ठेवी व्याजासोबत परतफेड केली आहेत का ? 

२. आपण दिलेले सर्व प्रकारचे कर्ज व्याजासहित जमा केले आहेत का ? अथवा त्याच्या मधून होणाऱ्या तोट्याची प्रोविजन केली आहे का ? 

३. कंपनीच्या नावानी असलेल्या सर्व मालमत्ता विकल्या आहेत आणि त्याचे पैसे बँक खात्यावर घेतले आहेत का ? 

४. आपण कंपनीच्या इतर देणी, उदा. इन्कम टॅक्स, GST, बाहेरील इतर लोकांचे देणे, थकीत पगारी व इतर भत्ते, लीगल फी, इत्यादी सर्व देणी दिलेली आहेत का ? 

५. कंपनीच्या नावानी असलेले सर्व बँक खाती बंद केलेली आहेत का ? 

६. निधीच्या नावानी असलेले सर्व रजिस्ट्रेशन (उदा. GST, PAN, उद्यम आधार, इत्यादी ) स्वेच्छेने रद्द केले आहेत का ? 

निधी कंपनी बंद करण्याआधी वरील तयारी अतिशय महत्वाची असते. कारण आपण निधी बंद करण्याचा अर्ज भरल्यावर त्यावर MCA कडून त्रुटी काढण्यात येते. त्या त्रुटी मध्ये वरील माहितीच विचारली जाते. आपण त्याची तयारी आधीच करायची. 

निधी कंपनी बंद करण्यासाठीची पात्रता 

कंपनी कायद्यानुसार निधी कंपनी दोन परिस्थितीत बंद होऊ शकते. प्रत्येक परिस्थितीत निधी बंद करण्याचे वेगवेगळे निकष आहेत. हे अतिशय महत्वाचे आहे. आपली निधी बंद करता येते का हे तपासताना आपण नेमक्या कुठल्या परिस्थितीत आहोत हे कळणे खूप महत्वाचे आहे. 

A. परिस्थिती - १

जर निधी कंपनीने रजिस्ट्रेशन पासून कसलाच व्यवहार केला नसेल. अशी निधी कंपनी त्याच्या रजिस्ट्रेशन पासून एक वर्ष पूर्ण झाल्यास बंद करता येते. यासाठी निधी कंपनीने नोंदणी पासून बँक खाते पण उघडले नसावे, ठेवी आणि कर्ज यामध्ये व्यवहार झालेला नसावा. एक वर्ष पूर्ण झाल्या नंतर ही निधी कंपनी नक्की बंद होऊ शकते. 

B. परिस्थिती - २ 

जर निधी कंपनीने रजिस्ट्रेशन पासून काही प्रमाणात व्यवहार केला असेल. अशी निधी कंपनी बंद होणे थोडे कठीण आहे. कारण त्यांनी ठेवी स्वीकारल्या असतील, सभासद नोंदणी केलेली असेल, कर्ज वाटप केलेले असेल. अश्या कंपन्यांना बंद करण्याचा अर्ज तपासताना MCA सर्व निकष पूर्ण झालेले आहेत की नाही याची कडून तपासणी करते. ज्यांनी व्यवहार चालू केलेला आहे त्यांना त्यांचे वर सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवहार बंद केल्या नंतर २ वर्ष थांबावे लागते आणि २ वर्ष पूर्ण झाल्यावर ती निधी कंपनी बंद करता येते.


निधी कंपनी बंद करण्याची प्रक्रिया (Nidhi Closure Process) 

संक्षिप्त रित्या, निधी कंपनी बंद करण्यासाठी ची प्रोसेस अशी असेल - 

१. सर्वात आधी निधी कंपनी ने आपले सर्व आर्थिक व्यवहार बंद केले पाहिजे. म्हणजे ठेवी घेणे, कर्ज वाटप, इतर सेवा देणे हे सर्व संपूर्णपणे बंद केले पाहिजे. याचा सरळ अर्थ असा आहे की निधी कंपनीच्या बँक खात्यात कसलीच एन्ट्री नसावी. आपले व्यवहार चालू आहेत की नाही हे आपल्या बँक खात्याच्या स्टेटमेंट वरून स्पष्ट दिसते. बऱ्याच निधी कंपन्या असे म्हणतात की आमचे सर्व व्यवहार आम्ही बंद केले आहेत. पण जुने दिलेले किरकोळ कर्ज वसुली काही दिवसात होईल. अश्या कंपन्या बंद होत नाहीत. 

२. आपल्या निधीचे सर्व रिटर्न भरलेले पाहिजे. नुसते भरून पण उपयोग नाही. सर्व रिटर्न्स परस्पर विरोधी माहिती देत नसावे. उदा. NDH-३ मध्ये कळवलेले एकूण ठेवी आपल्या balance sheet ला सल्लग्न नसतात. 

३. शक्यतो आपण निधी कंपनी चे बँक खाते बंद केलेले असावे. 

४. आपल्या CA कडून एक स्टेटमेंट ऑफ अकाउंट तयार करून घेणे. हे नियमात बसातासेल तरच निधी कंपनी बंद होते अथवा नाही. 

५. ROC च्या नियमाप्रमाणे सर्व affidavit तसेच indemnity बॉण्ड तयार करून बाकी सर्व लागणारे कागदपत्र एकत्र करणे. 

६. हे सर्व तयार झाल्यास ROC मध्ये STK-२ नंबर चा फॉर्म भरून निधी कंपनी बंद करण्याचा अर्ज भरणे. 

अतिशय महत्वाचे 

निधी कंपनी बंद करणे सोपे नाही. आपल्या संस्थांमध्ये नागरिकांचे पैसे गुंतवलेले असल्यामुळे निधी कंपनी बंद करण्यापूर्वी जनतेचे सर्व पैसे दिलेले असल्याची खात्री शासन करून घेते. त्यामुळे निधी कंपनी बंद करण्याची असल्यास प्रचंड संयम तसेच कमालीची शिस्त असणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास आपले निधी बंद करण्याचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो आणि त्यासाठी आलेला खर्च पण पूर्णतः वाया जाऊ शकतो. 

निधी कंपनी बंद करण्यासंदर्भात काही शंका असल्यास कॉमेंट मध्ये शंका पोस्ट करा. तसेच आपल्या कंपनीच्या सल्लागार सोबत चर्चा करा. 

राघवेंद्र कुलकर्णी । Partner
RBKRS | www.rbkrs.in


Raghav Kulkarni