निधी कंपनी ही एक वित्तीय संस्था म्हणून ओळखली जाते. निधीचे संपूर्ण काम निधी नियम २०१४/२०१९ प्रमाणे चालते. नियम क्रमांक १५ मध्ये कर्जाच्या संदर्भात नियम दिलेले आहे. निधी कंपनी विनातारण कर्ज देऊ शकत नाही. कर्जाच्या प्रकाराला आपण वेगवेगळे नाव देत असतो. वयक्तिक कर्ज, शॉर्ट टर्म कर्ज, लाँग टर्म कर्ज, इत्यादी. आपण कुठल्याही नावानी कर्ज देत असू तरी पण निधी नियमाप्रमाणे त्याचा प्रकार कुठला आहे ते जास्त महत्वाचे आहे. आपण वेळोवेळी भरत असलेल्या NDH रिटर्न मध्ये आपल्याला निधी नियमात दिलेल्या तारणाच्या प्रकाराप्रमाणे तपशील द्यावा लागतो. आपण दैनंदिन व्यवहारात कर्जाचे विविध नावे वापरतो. पण निधी नियमाप्रमाणे त्याचे तारण घेतले आहेत का ते बघणे गरजेचे आहे.
निधी कंपनी आणि इतर वित्तीय संस्था मध्ये बराच फरक आहे. इतर संस्था प्रकारात विनातारण कर्ज देण्याची तरतूद आहे. निधी कंपनी मुळात सभासदांना बचतीची सवय लावण्यास तयार झालेली आहे. कर्ज देत असलेली रक्कम ही पूर्णतः सभासदांचीच असल्यामुळे निधी नियमात विणातरण कर्ज देण्यास निर्बंध आहेत.
निधी नियम १५ (४) प्रमाणे खालील तारण प्रकार दिलेले आहेत -
१. सोने तारण (gold loan)
२. स्थावर मालमत्ता तारण (mortgage loan)
३. मुदत ठेव तारण (Fixed Deposit Loan)
४. सरकारी बॉण्ड तारण (Loan against Government Bond) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र तारण (Loan against National Saving Certificate) आणि विमा पॉलिसी तारण (Loan against Insurance Policy)
प्रत्येक दिलेल्या तारण प्रकारचे विविध नियम आहेत. त्या तारणावरील पात्र कर्ज मर्यादा, त्याचा कालावधी आणि इतर नियम हे खाली दिलेले आहेत -
सोने तारण (gold loan)
१. सोने मूल्यांकन गरजेचे
२. सोने किमतीच्या ८० टक्के कर्ज देता येते.
३. कालावधी १ वर्ष.
स्थावर मालमत्ता तारण (mortgage loan)
१. ह्यात घर, दुकान, गाळा, मोकळी जागा, शेतकी जमीन हे सर्व येते.
२. मालमत्तेच्या मूल्यांकन केलेल्या किमतीच्या ५० टक्के कर्ज देता येते.
३. शेतकी जमीन वर कर्ज करत असला तर एक लक्षात ठेवा की जर कर्ज परतफेड झाली नाही तर आपण शेतकी जमीन विकून कर्ज वसुली करू शकत नाही.
४. Mortgage लोन चा भाग हा एकूण सर्व तारणावर दिलेल्या कर्जाच्या ५० टक्क्यांपेक्षा नसावा. उदा. जर आपले सर्व तारणावरचे एकूण कर्ज ₹१०० लाख असेल (Total Outstanding Loan) तर त्यातील स्थावर मालमत्तेचे तारण करून दिलेले कर्ज ₹५० लाख पेक्षा जास्त नको. म्हणजे आपल्या एकूण कर्जाच्या मध्ये mortgage कर्ज ५० टक्याच्या आतील हवे. आपण सर्व च्या सर्व कर्ज mortgage स्वरूपाचे देता येणार नाही.
५. mortgage लोन आपल्याला ७ वर्षाच्या कालावधी साठी देता येते.
मुदत ठेव तारण (Fixed Deposit Loan)
१. मुदत ठेवीच्या ८० टक्के कर्ज देता येते.
२. कर्जाचा कालावधी हा त्या FD चा शिल्लक राहिलेल्या कालावधी पेक्षा जास्त नसावा. म्हणजे जर एखादी FD ५ वर्ष कालावधीची असेल आणि त्यातील ३ वर्ष झालेले असल्यास त्यावर तारण करून कमाल २ वर्षासाठीच कर्ज देता येते.
३. FD ची maturity तारीख ही कर्जाच्या मुदतीच्या आतील पाहिजे.
सरकारी बॉण्ड तारण (Loan against Government Bond) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र तारण (Loan against National Saving Certificate) आणि विमा पॉलिसी तारण (Loan against Insurance Policy)
१. तारण मूल्याच्या ८० टक्के कर्ज देता येते.
२. वरील प्रकारचे डॉक्युमेंट निधी कंपनी कडे Pledge स्वरूपात घेतले पाहिजे.
३. maturity तारीख ही कर्जाची मुदत अथवा १ वर्ष याच्या आतील पाहिजे.
कृपया हे लक्षात घ्या की कर्ज प्रकरणे करताना निधी नियमाप्रमाणे तारण घेणे खूप गरजेचे आहे. आपण भरत असलेल्या NDH-३ रिटर्न मध्ये निधी ला तारणाच्या प्रकाराप्रमाणे कर्जाचा तपशील द्यावा लागतो. त्यामुळे जर आपण ग्राह्य नसलेले इतर तारण घेत असाल अथवा विनातारण कर्ज देत असाल तर ते बेकायदेशीर आहे आणि पुढे जाऊन निधी कंपनी अडचणीत येऊ शकते.
अतिरिक्त तारण (Additional Security)
निधी नियमात अतिरिक्त तारण (Additional security) घेण्यासाठी निर्बंध नाहीत. त्यामुळे आपल्याला मोठे कर्ज प्रकरणे करताना निधी नियमात दिलेल्या तारण प्रकरासोबत अतिरिक्त तारण घेण्यास काही हरकत नाही.
कायदेशीर बाजू
वरील दिलेल्या सर्व प्रकारात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कर्ज देताना तो ग्राहक आपला सभासद आहे की नाही याची खात्री करून घ्या आणि आपली कर्जाची फाईल निधी नियमात बसायला आपले अंतर्गत सर्व फॉर्म, करारणामे, इत्यादी पूर्णतः निधी नियमात बसणारे असावे. म्हणजे पुढे एखादे प्रकरण कोर्टात गेले तर आपले करारनामे कोर्टाला मान्य झाले पाहिजे.
लेख मोठा झाल्याबद्दल क्षमस्व. पण विषय पूर्ण समजला पाहिजे.
धन्यवाद
Raghvendra Kulkarni | RBKRS | 9850432434
निधी नियम - तारण प्रकार
16.02.23 07:29 AM