कलम ४०६ ची कारणे दाखवा नोटीस - निधी कंपनी
(Show Cause Notice u/s 406 of Companies Act, 2013 for Nidhi Companies)
मागील काही दिवसात बऱ्याच निधी कंपन्यांना ROC ऑफिस कडून कलम ४०६ अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. फॉर्म NDH-४ भरण्यासंदर्भात ही नोटीस पाठवण्यात येत आहे. सर्व निधी कंपन्यांना या नोटीस ला काय उत्तर द्यावे या संभ्रमात आहेत. हा संक्षिप्त - लेख त्यावर प्रकाश टाकण्यासाठी आहे.
१. काय आहे ही कलम ४०६ ची नोटीस ?
कंपनी कायद्यातील कलम ४०६ नुसार निधी कंपन्या रजिस्टर होतात तसेच त्याचे नियोजन चालते. निधी नियमाचा जन्म वरील कलम ४०६ नुसारच झाला आहे. कलम ४०६ प्रमाणे निधी कंपन्यांची कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे आणि तसेच त्याचे नियंत्रण चालते. या कलम अंतर्गतच निधी कंपन्यांना निर्देश देण्यासाठी नियमावली तयार झाली तसेच त्यात सुधारणा झाल्या.
कलम ४०६ मध्ये खालील कायदेशीर तरतुदीचा समावेश आहे -
१. निधी कंपन्यांची संकल्पना अधोरेखित करणे
२. निधी कंपनी नोंदणी
३. निधी कंपनी संदर्भात नियम तयार करण्याचा अधिकार
४. नियमाच्या अंमलबजावणी साठी अधिकार वाटप
५. नियम बाह्य काम करणाऱ्या निधी कंपन्यांसाठी दंड आणि इतर कार्यवाही संदर्भात अधिकार
कलम ४०६ हे निधी नियमाचा आणि निधी संकल्पानेचा मुख्य स्त्रोत आहे असे म्हणल्यास गैर ठरणार नाही. त्यामुळे आपल्याला आलेली नोटीस कलम ४०६ तसेच निधी नियमातील नियम ३A अंतर्गत पाठवण्यात आली आहे.
२. आम्हाला ही नोटीस का आली ?
ही नोटीस पाठवणे हा रजिस्ट्रार ऑफ कंपनीस (ROC) चा अधिकार आहे. आपल्या निधी कंपनी ने निधी नियमांचे उल्लंघन केले आहे असे ROC ऑफिसर ना वाटत असेल तर ते आपल्याला कारणे दाखवा नोटीस पाठवू शकतात. विशिष्ट नियमाचा संदर्भ देऊन निधी कंपन्यांकडून त्याबद्दल लेखी स्पष्टीकरण मागवणे अथवा कंपनीच्या संचालकांना ROC ऑफिस ला बोलावण्याचा अधिकार पण आहे.
आपल्या निधी कंपनी मध्ये खालील पैकी एक परिस्थिती उद्भवली असावी -
१. आपल्या निधी कंपनी ने NDH-४ फॉर्म वेळ निघून गेला तरीही भरला नसावा.
२. आपल्या निधी कंपनीचा NDH-४ MCA कडून अमान्य (Reject) झाला असावा.
३. आपल्या निधी ने NDH-४ फॉर्म भरला असेल पण तो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख उलटुन गेली तरीही आपल्या फॉर्म ला काही उत्तर आले नसावे.
४. MCA Version ३ मध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी मुळे आपल्याला NDH-४ भरता आला नसावा.
वरील पैकी अथवा इतर कुठल्याही कारणास्तव आपला NDH-४ भरला गेला नसेल तर आपल्याला ROC कडून कारणे दाखवा नोटीस येऊ शकते.
३. याला उत्तर कसे आणि काय द्यावे ?
सर्वसाधारपणे कलम ४०६ ची कारणे दाखवा नोटीस सर्वांना सारखीच आली आहे. पण त्याचे उत्तर प्रत्येकाचे वेगळे असेल. प्रत्येक निधी कंपनी ने दिलेल्या नियमात आपण कुठे बसतो त्याप्रमाणे उत्तर दिले पाहिजे. हे उत्तर देत असताना खालील काळजी घ्यावी -
१. उत्तर देताना आपल्या निधी कंपनीची NDH-४ फॉर्म संदर्भातली काय परिस्थिती आहे याचा आढावा घ्यावा.
२. उत्तर तपशीलवार आणि संदर्भ देऊन असावे.
३. गरज पडल्यास कायदा तसेच विशिष्ट नियमाचा संदर्भ द्यावा.
४. आपल्या निधी ची वस्तुस्थिती कळवावी. उगाच खोटी करणे देऊ नये. आपण दिलेले उत्तर बघून ROC अधिकारी अतिरिक्त माहिती मागवू शकतात.
५. मुद्देसूद उत्तर द्यावे. उगाच इतर गरज नसलेल्या बाबींचा उल्लेख टाळा.
६. नोटीस आपल्याला मिळाल्यापासून दिलेल्या वेळेत उत्तर असावे. नोटीस ची तारीख पासून नाही. त्यामुळे आपल्याला ही नोटीस कधी मिळाली त्याचे पाकीट जपून ठेवावे.
४. उत्तर नाही दिल्यास काय होऊ शकते ?
शासकीय प्रणाली मधील अधिकाऱ्याने पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीस ला उत्तर देणे आपल्याला बंधनकारक आहे. उत्तर न दिल्यास आपण शासनाने दिलेल्या बाबींना मान्य करत आहोत असा त्याचा अर्थ होतो आणि त्याप्रमाणे शासनाला पुढील कार्यवाही करता येते. आपण जर वरील नोटीस चे उत्तर नाही दिले तर ROC अधिकाऱ्यांना कलम २०६ / २०७ अंतर्गत तपास नोटीस पाठवण्याचा अधिकार आहे. तसेच उत्तर नाही दिल्यास आपल्या निधी कंपनी ला निधी नियमाचे उल्लंघन पोटी दंड आकारण्याचा अधिकार आहे.
कृपया लक्षात घ्या - निधी (सुधारणा) नियम २०१९ प्रमाणे ज्या निधी कंपन्यांनी NDH-४ भरला नाही अथवा त्यांचा NDH-४ अमान्य झालेला आहे अथवा NDH-४ भरण्याची शेवटची तारीख उलटून गेलेली आहे, त्या निधी कंपन्यांनी नवीन कर्ज वाटप अथवा नवीन ठेवी घेणे हे करता येणार नाही. या नियमाला डावलून ज्यांनी अजुनही व्यवहार चालू ठेवले आहेत त्यांना इथून पुढे खूप अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. तसेच नव्याने घेतलेल्या ठेवी आणि दिलेले कर्ज निधी नियम बाह्य आणि बेकायदेशीर असतील.
वरील नोटीस चे उत्तर निधी कंपनी ने तसेच सर्व संचालकांनी पण देणे बंधनकारक आहे.
राघव कुलकर्णी । RBKRS | 9850432434
www.rbkrs.in